नंदुरबार - तालुक्यातील चौपाळे गावाच्या शिवारात दशरथ पाटील या शेतकऱ्याच्या शेतातील पपईची जवळपास 60 ते 70 झाडे अज्ञात माथेफिरुने कापून टाकल्याची घटना समोर आली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड केली जाते. मोठ्या प्रमाणात पपई उत्पादक शेतकरी आहेत. धुळे-नंदुरबार रस्त्याला लागून दशरथ पाटील यांची शेती आहे. त्यात तीन एकर पपईची लागवड केली आहे. मोठ्या मेहनतीने पपईची झाडे त्यांनी वाढवली होती. पपईला फळांची लागण झाली होती. मात्र अज्ञात माथेफिरुने शेतातील 70 ते 80 झाडे कापून फेकली आहेत. त्यामुळे दशरथ पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. गेल्या पाच ते सहा महिन्यात नंदुरबार जिल्ह्यात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.
अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल -
याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी शहादा तालुक्यातील परिवर्तन येथे एका शेतकऱ्याच्या शेतातून सुमारे दीड ते दोन एकर केळीची पिके अज्ञात माथेफिरुने कापली होती. त्या अज्ञात माथेफिरुचा तपास अद्याप लागलेला नाही.
हेही वाचा - आमदार पडळकरांच्या भावासह १२ जणांवर गुन्हा दाखल, सांगली जिल्ह्यात मंदिरात चप्पल घालून आल्याचा वाद