नंदुरबार - दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात आदिवासी बांधवांकडून 'डोंगऱ्यादेव उत्सव' उत्साहात साजरा केला जातो. उत्सवामुळे आदिवासी बांधवांसह ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. आदिवासी बांधव यावेळी कडक व्रत पाळतात. या उत्सवात आदिवासी कुटुंबातील एक व्यक्ती पंधरा दिवस सहभागी होतो.
हेही वाचा - B'day Spl: रजनीकांत यांचा ७० वा वाढदिवस, वाचा त्यांच्यावर तयार करण्यात आलेले भन्नाट विनोद
हा उत्सव आदिवासी वस्तीच्या मध्यभागी साजरा केला जातो. या जागेवर बांबू किंवा काठी उभी करून कुंपण केले जाते. तसेच एक प्रवेशद्वार असते त्याला आदिवासी बांधव 'खळी' असे संबोधतात. खळीच्या मध्यभागी मांडव (छत) टाकला जातो. मांडवाखाली देवदाडा उभा करून त्यास झेंडूच्या फुलांच्या माळा बांधल्या जातात. इथेच रात्रभर जागरण करून आदिवासी बांधव लयबद्ध चालीवर नाचतात. यावेळी देवदेवतांचे कथन केले जाते. त्यासाठी थाळी हे वाद्य लावण्यात येते. उत्सवात सहभागी झालेल्या व्यक्तींना 'भाया' म्हणून संबोधले जाते.
भायांना पहाटे लवकर उठून थंड पाण्याने अंघोळ करावी लागते. दिवसभर परिसरातील गावागावात जाऊन प्रत्येकाच्या घरासमोर डोंगऱ्या नावाचा गोल फेरा धरून नाचत शिधा म्हणून धान्य मागितले जाते. दिवसभर फिरून झाल्यावर रात्री पुन्हा आदिवासी बांधव आपल्या खळीवर येतात. सदर उत्सव पंधरा दिवस चालतो. देवाचे व्रत करणाऱ्या सर्व भाविकांना रात्री मक्याची कोंडी, तेल न वापरलेली भाकरी, ज्वारी किवा नागलीची भाकर असे भोजन दिले जाते. उत्सवाची सांगता मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला होते. या पोर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री डोंगरातील देवतेच्या ठिकाणी गड घेण्यासाठी जातात. या ठिकाणी रात्री कोंबडा सोडला जातो. ज्याठिकाणी गड असतो. तेथील गुहेला रात्री बांबूच्या काठ्या लावल्या जातात. पोर्णिमेच्या दिवशी गुहा उघडली जाते. 5 महिला आतमध्ये जाऊन तेथील देवतांचे पूजन करून गडामधून पाण्याचा हंडा भरून आणतात. त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम पार पडतो.
हेही वाचा - ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार 16 वर्षीय ग्रेटा थनबर्गला जाहीर