नंदुरबार - धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिन्याभरापूर्वीच याच ठिकाणी लक्झरी बसचा अपघात होऊन पाच जणांचा बळी गेला होता.
धुळ्याकडून- सुरतकडे जाणाऱ्या स्विफ्ट गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकने कारला धडक दिली. त्यामुळे कार पुलावरून ४० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने जखमींना व मृतदेहांना बाहेर काढण्यात आले आहे.
याच पुलाने घेतला होता पाच जणांचा बळी-
कोंडाईबारी घाटातील याच पुलावरून गेल्या महिन्यात लक्झरी बस कोसळली होती. या घटनेत पाच जणांनी जीव गमावला होता. तसेच अनेक जण या भीषण अपघातात जखमी झाले होते. त्याच ठिकाणी पुन्हा झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
पूल दुरुस्तीच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष -
गेल्या दोन-तीन वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून हा पूल बनवण्यात आला आहे. पूल बांधल्यापासून स्थानिक नागरिक व तसेच राजकीय-सामाजिक व्यक्तींकडून पुलाला कठडे लावून दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने या पुलाच्या कठड्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले नसल्याचे समोर आले आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होऊन वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मृत्यूचा सापळा बनत चाललेल्या राष्ट्रीय महामार्ग अजून किती जणांचा बळी घेतो, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.