नंदूरबार - जिल्ह्यात मार्च महिन्यात नागरिकांना मे हिटचा अनुभव मिळत आहे. सूर्य आग ओकत असून दुपारी रस्ते ओस पडू लागले आहेत. मागील २ दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली असून पारा ४० अंशाच्या वर स्थिरावला आहे. याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. दरम्यान, पुढील २ दिवसांत तापमानात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तापमानात २६ मार्चपासून वाढ झाली आहे. त्याचा परिणाम जनजीवनावर आणि शेतीवर होत असून सकाळी ११ वाजल्यापासूनच रस्ते ओस पडू लागलेत. तर दुसरीकडे शितपेयांच्या दुकानावर गर्दी दिसून येत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक छत्री, रुमाल, टोपी, गॉगल आदी साधनांचा उपयोग करीत आहेत. मात्र, दुपारी १२ वाजेपासून ते ४ वाजेपर्यंत शहरात अघोषित संचारबंदीसारखी परिस्थती पाहायला मिळत आहे.
उन्हात बाहेर निघताना काळजी घ्यावी - डॉ. राजेश दळवी
वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी बाहेर पडताना डोक्यावर रुमाल, टोपी, गॉगल या साधनांचा वापर करावा. सोबतच पाण्याची बॉटल ठेवावी. तसेच दुपारी काम नसेल तर बाहेर उन्हात निघणे टाळावे, असा सल्ला डॉ. राजेश दळवी यांनी दिली.