नंदुरबार - शाळा प्रवेशासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. त्यामुळे शहादा शहरातील जुन्या तहसील कार्यालयात असेल्या आधार नोंदणी केंद्रावर ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांना घेऊन रांगेत उभे राहत आहेत. सकाळपासूनच पालक आणि विद्यार्थी या केंद्रावर रांगा लावतात. एकीकडे जिल्हा प्रशासन कोरोना काळात काळजी घेत असल्याचे सांगत आहे तर दुसरीकडे या मुलांना तासन् तास रांगेत बसावे लागत असल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय अद्याप राखीव ठेवला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र निश्चित करण्यासाठी परवानगी दिली आहे, शाळांना याबाबत आदेशही दिले आहेत. त्या अनुषंगाने शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू केले आहे. प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही असे विद्यार्थी आणि पालक आधार कार्ड काढण्यासाठी किंवा जुने कार्ड अपडेट करण्यासाठी आधार केंद्रांवर गर्दी करत आहेत.
आधार केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर होणाऱया गर्दीमुळे पालकांसह विद्यार्थ्यांना चार ते पाच तास वाट पहावी लागत आहे. या आधार केंद्रांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली जात नाही आहे की नाही, हादेखील प्रश्न उपस्थित होत आहे.