नंदुरबार Stone Pelting In Shahada: घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवित कडेकोट बंदोबस्त ठेवला. दरम्यान परिसरात तणावपूर्ण शांतता असून याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका जखमीची प्रकृती चिंताजनक : शहादा शहरात काल दोन गटातील जमावात दगडफेक झाल्याचा प्रकार घडला आहे. या दोन्ही गटातील जमावाने एकमेकांवर दगड, विटांचा मारा केल्याने दगडफेकीत 3 जण गंभीर तर 10 हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील एका जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. जमावाकडून झालेल्या दगडफेकीच्या घटनेने शहरातील श्रमिकनगर, भवानीनगर परिसरात धावपळ झाली. जमावाकडून 5 मोटरसायकली, दोन चारचाकी वाहने व दोन घरे व एका दुकानाची नासधूस करीत नुकसान करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, शहाद्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवित परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त : दगडफेकीच्या घटनेची स्थिती पाहता राज्यराखीव दलाच्या तुकडीसह दंगा नियंत्रण पथक नंदुरबार, अ़क्कलकुवा, शहादा, सारंगखेडा, म्हसावद, धडगाव, तळोदा येथून कुमक मागविण्यात आली. अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही मागवून पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. संवेदनशील भागात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनीही शहादा येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं. या घटनेचं गांभीर्य ओळखून शहादा शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक शहाद्यात दाखल : शहादा येथे झालेल्या दगडफेकीची माहिती मिळताच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील हे शहाद्यात आले. यावेळी त्यांनी घटनास्थळ परिसरात पाहणी करीत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका व शांतता ठेवावी असं आवाहन केलं.
हेही वाचा: