नंदुरबार- ऐन खरिपाच्या तोंडावर राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी संप पुकारला आहे. राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. या संपाचा शनिवारी दुसरा दिवस आहे.
राज्यातील सर्व कृषी केंद्र चालकांनी शुक्रवारपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे. राज्यातील काही भागांमध्ये कृषी सेवा केंद्र चालकांवर कृषी खात्याकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री केल्याचा आरोप ठेवत कंपनीसह कृषी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकाच्या संघटनेने संपूर्ण राज्यात तीन दिवसाचा संप पुकारला आहे. उद्या (रविवारी) या संपाचा सेवटचा दिवस आहे.
राज्यशासनाने कृषी केंद्र चालकांवरील गुन्हे मागे घ्यावील यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाअधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांना देण्यात आले. निवेदनावर राजेंद्र राजपूत, कार्याध्यक्ष कन्हैय्यालाल पटेल, सचिव राजेशकुमार वाणी आदींच्या सह्या आहेत. याप्रसंगी सुरेशभाई पटेल, रविंद्रशेठ कलाणी, निरवभाई शाह, मुकेश जोशी, बाबुसेठ जैन आदी उपस्थित होते.