नंदुरबार- महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या प्रकाशा- समशेरपुर रस्त्यावर अवैध दारुसाठा आणि हातभट्टी दारु निर्मितीसाठी उपयोगात येणारे साहित्य घेऊन जाणाऱ्या एका अॅपे रिक्षावर कारवाई करत ६,८७,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.
नंदुरबार जिल्ह्याचा काही भाग मध्य प्रदेश सीमेला लागून असल्याने त्या राज्यातून जिल्ह्यात अवैध दारूसाठा आणि हातभट्टीची दारू बनविण्यासाठी वापरात येणारे मोहफुल व इतर साहित्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत १२० किलो मोहफुल, ६० किलो काळा गूळ, ४० किलो नवसागर आणि अॅपे रिक्षा वाहन जप्त करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक मनोज सोबंधी, अनुपकुमार देशमुख यांच्या पथकाने मुद्देमाल जप्त करत वाहनचालकाला अटक केली आहे.