नंदुरबार - सिनेअभिनेत्री कंगना रणौतने मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते. त्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा शिवसेना आणि शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने तीव्र निदर्शने करत कंगना रणौतच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. त्यानंतर प्रतिमेला काळे फासण्यात आले.
शहरातील अंधारे चौक परिसरात शिवसेना महिला आघाडी तसेच शिवसैनिकांतर्फे कंगना रणौतनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात रणौतच्या प्रतिमेला जोडे मारून काळे फासण्यात आले. या आंदोलनात नंदुरबार शिवसेना आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र आणि मुंबईबद्दल कोणतेही अपमानकारक वक्तव्य सहन करणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रीना पाडवी, नंदुरबार नगर पालिकेच्या नगरसेविका कल्याणी मराठे, युवा मोर्चाचे अध्यक्ष अर्जुन मराठे व शिवसेनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
दरम्यान, कंगनाच्या मुंबईवरील वक्तव्यावरून राज्यभरात वातावरण पेटले आहे. कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यानंतर कंगनावर सर्व माध्यमांतून टीकेचा भडिमार सुरू आहे. कंगनाच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथे सेनेच्या वतीने मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणाऱ्या आणि मुंबईची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात आंदोलन करून निषेध करण्यात आला.
हेही वाचा - नंदुरबार आणि नवापूर शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा