नंदुरबार - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नंदुरबार व शहादा शहर हद्दीतील सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, निवासी शाळा, कॉलेज, वसतीगृहे, कोचिंग क्लासेस व प्रशिक्षण केंद्र 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील आठवडे बाजारदेखील बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा शहरात नंदुरबार जिल्ह्याच्या एकूण रुग्णांचे 80 टक्के कोरोनाचे रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे रुग्णवाढीचा आलेख दर दिवसाला उंचावत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहेत. यामुळे नंदुरबार व शहादा शहर हद्दीतील सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, निवासी शाळा, कॉलेज, वसतीगृहे, कोचिंग क्लासेस व प्रशिक्षण केंद्र 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
हेही वाचा - 'एमपीएससी'ची नवी तारीख जाहीर, मात्र गोंधळ कायम
हॉटेल व्यावसायिकांनी घरपोच पार्सल सुविधा पुरवावी -
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिलेल्या आदेशात नंदुरबार व शहादा शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यगृहे यांच्यामार्फत जास्तीत जास्त घरपोच पार्सल सुविधा पुरविण्यास प्राधान्य देण्यात यावे. घरपोच सुविधांचे किचन वितरण कक्ष सायकांळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल, असेही सांगितले.
हेही वाचा - मी क्राईम ब्रांचमधून मुक्त झालो - सचिन वझे
आठवडे बाजार बंद -
नंदुरबार व शहादा शहरात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने नंदुरबार व शहाद्यात मंगळवारी भरणारा हद्दीतील आठवडे बाजार बंद राहतील. जेणेकरून आठवडे बाजारात गर्दी होणार नाही व कोरोनाचा प्रसार रोखण्यास प्रशासनाचे मदत होईल.
नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई -
प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही व्यक्ती, समुह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.