नंदुरबार - राज्य महिला आयोगाच्या महत्वाकांक्षी प्रज्वला योजनेच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ शनिवारी नंदुरबारमध्ये करण्यात आला. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
राज्यातील ३ लाख बचतगटांच्या माध्यमातून ६० लाख महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प या योजनेतून करण्यात आला आहे, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले. तीन टप्यात असणाऱया प्रज्वला योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात बचत गटांना प्रशिक्षण, दुसऱया टप्यात एक जिल्हा एक क्लस्टर आणि तिसऱया टप्यात सर्व पालिका, महापालिका, पचांयत क्षेत्रात प्रज्वला मॉल उभे केले जाणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्ली हाटच्या धर्तीवर राज्यात योजना राबवणार असल्याचे सांगितले. पर्यटन विभागाने तयार केलेली काही दुकाने महिला बचत गटांना उपलब्ध करुन देण्याची घोषणा देखील केली.
नंदुरबार जिल्हातुन प्रज्वला योजनेच्या प्रशिक्षण टप्याला सुरवात झाली असून यापुढे ६ महिन्यांत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अशाच पद्धतीने महिला बचत गटांचे मेळावे आयोजीत केले जाणार आहेत.