नंदुरबार : बँकेच्या एटीएममध्ये कॅश पुरवठा करणाऱ्या व्हॅनवरील कर्मचाऱ्यानेच तब्बल एक कोटी पाच लाखांची रोकड घेऊन पलायन केले आहे. ही धक्कादायक घटना नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरात घडली आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
1 कोटी रुपयांच्या रकमेवर डल्ला : पैसा पाहून भल्या भल्यांची नियत फिरते, असं बोललं जातं. याचाच प्रत्यय आज नंदुरबारमध्ये आला. कोट्यवधींची रोकड पाहून एका कर्मचाऱ्याची नियत फिरली अन् तो रोकडसह फरार झाला. बँकेच्या एटीएमला कॅश पुरवठा करणाऱ्या व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी तब्बल 1 कोटी 5 लाखांच्या रोकडवर डल्ला मारला आहे. नंदुरबार शहरातील धुळे चौफळीजवळ रायटर कार्पोरेशन कंपनीची व्हॅन एका फायनान्स कंपनीच्या कॅश कलेक्शनसाठी थांबली होती. ही व्हॅन यानंतर एसबीआयच्या एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी जाणार होती. मात्र, त्यापूर्वीच व्हॅनवरील एका कर्मचाऱ्यानेच दुचाकीवर जाऊन रक्कम एटीएममध्ये भरणा करून येतो, असे सांगितले.
कर्मचाऱ्यावर रक्कम लांबवल्याचा संशय : हा कर्मचारी पोलीस मुख्यालयातील एटीएममध्ये पैशाचा भरणा करण्यासाठी गेला होता; मात्र तब्बल दोन तास उलटून देखील तो परतलाच नाही. यामुळे ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्याने लांबविली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नंदुरबार शहरातील धुळे चौफुली जवळ ही घटना घडली. यानंतर मात्र एकच खळबळ उडाली आहे. घटना घडल्यानंतर तब्बल दोन तासांनी पोलिसांसोबत याप्रकरणी संपर्क साधण्यात आला. यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, एलसीबी पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आदींनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.
जिल्हाभरात नाकाबंदी : ही व्हॅन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहे. आरोपीच्या शोधासाठी जिल्हाभरात नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. असे असले तरी या घटनेने मात्र सर्वत्र खळबळ माजली. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीसुद्धा एटीएम कर्मचाऱ्यानेच एटीएममधील पैशांवर डल्ला मारल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत.
हेही वाचा: