नंदुरबार - जिल्हा कोरोनामुक्त झाल्याने नागरिक आनंदात होते. अशात मंगळवारी रात्री नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील एका संशयिताचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. दरम्यान, प्रशासनातर्फे रजाळे गावात खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचा आनंद काही तासच टिकला. सर्वत्र कोरोनामुक्तीचा आनंद असताना मंगळवारी रात्री त्यावर विरजण पडले. तालुक्यातील रजाळे येथील 66 वर्षीय वृध्दाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी 57 जणांचे अहवाल प्रतिक्षेत होते. त्यापैकी 27 अहवाल प्रशासनाला रात्री उशिरा प्राप्त झाले. त्यात रजाळे येथील 66 वर्षीय वृध्दाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
सदर कोरोनाबाधित रुग्ण हा मुंबई येथील मुलीकडे एक महिना वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आता प्रशासन कामाला लागले असून रजाळे येथे प्रतिबंधीत क्षेत्र तयार करण्यात येत आहे. बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. बाधित व्यक्ती नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये गेल्या तीन दिवसांपासून दाखल आहे.