नंदुरबार - कोरोना विषाणूचा फैलाव, लॉकडाऊन आणि वाढत्या तापमानाचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरीही संकटात सापडला आहे. लॉकडाऊनमुळे व्यापारी येत नाहीत. वाढत्या तापमानात पपईची फळे पिवळी पडत आहेत. फळे शेतात अधिक काळ पडून राहिल्याने शेतकऱ्यांचा बागा उद्ध्वस्त होत आहेत. केलेला खर्च ही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यात पाच हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जाते. या वर्षी पपईचा हंगाम सुरू झाला आणि कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. कोरोनाच्या धास्तीने व्यापारी आले नाहीत. जे आले ते मातीमोल भावात पपईची मागणी करत आहेत. यामुळे शेतकऱ्याची स्थिती बिकट झाली आहे. त्यातच जिल्ह्यात अचानक तापमानवाढ होऊन पारा 40 अंश सेल्सियसच्या पुढे गेला. 42 ते 43 अंश तापमानाचा पपईच्या फळावर परिणाम झाला आहे. इतक्या तापमानात फळे झाडावर खराब होऊन पिवळी पडत आहेत. ती काढून फेकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरलेला नाही. काही झाडेही मुळापासून उन्मळून पडली आहेत. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना म्हणावे तशी गत झाली आहे.
केंद्र सरकार देशातील छोट्या-मोठ्या उद्योजकांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा करत आहे. मात्र, कोरोनामुळे अन्नदाता शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपला आहे. त्यालाही मदत झाली पाहिजे, हीच त्याची अपेक्षा आहे.