नंदुरबार - जिल्ह्यातील तापी नदीवरील उपसासिंचन योजनांच्या दुरुस्तीसाठी शासनाने निधी मंजूर केला असला तरी उपसासिंचन दुरुस्तीचे काम संथ गतीने चालू आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. यावर्षी पाऊस कमी झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे. शेतातील विंधन विहिरी आटल्या आहेत. शेतीला पाणीपुरवठा कसा करावा हा शेतकऱ्यांपुढे यक्षप्रश्न उभा ठाकला आहे.
उपसासिंचन योजना कार्यान्वित होतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पाईपलाईन करण्यास सुरुवात केलेली आहे. पण हा खर्च यंदा वाया जाऊन शेती कोरडीच राहील, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. शासनाने लवकरच उपसासिंचन योजना कार्यान्वित कराव्यात, त्यांना वीजजोडण्या देण्यात याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यंदाच्या हंगामात शेतात पाणी आले नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गावकरी बहिष्कार टाकतील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. नंदुरबार व धुळे जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या तापी नदीवर नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा व सारंगखेडा येथे बॅरेज बांधण्यात आलेले आहेत. दरवर्षी या बॅरेजमध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याचा साठाही होतो. परंतु हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नेण्यासाठीच्या सर्वच उपसासिंचन योजना बंद पडल्याने कित्येक वर्षांपासून हे भरमसाठ पाणी वाया जाते आहे.
स्व. आण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या भगीरथ प्रयत्नाने काही वर्षांपूर्वी तापी नदीवर शेतकऱ्यांच्या मदतीने सुमारे २२ उपसासिंचन योजना तयार करण्यात आल्या होत्या मात्र कालांतराने तापी नदीच कोरडी पडल्याने त्या कुचकामी ठरल्या होत्या. या उपसासिंचन योजनांचा वापर करून शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी प्रकाश व सारंगखेडा येथे बॅरेज बांधण्यात आलेले आहेत. मात्र कित्येक वर्षांपासून या उपसासिंचन योजना खितपत पडल्याने त्यातील साहित्य नाहीशे झाले असून ते पूर्णतः क्षतीग्रस्त झाल्या आहेत. परिणामी त्या पूर्णपणे कुचकामी ठरल्या आहे. त्यावर भरमसाठ कर्ज तर होतेच. वीजबिलांचाही मोठा बोझा होता.
या बंद पडलेल्या उपसासिंचन योजना कार्यान्वित झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांचे कल्याण होणार हे पाहून सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बापूसाहेब दीपक पाटील यांनी माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या मदतीने या उपसासिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी शासनदरबारी मोठे प्रयत्न करून दुरुस्तीचा निधीही मंजूर करून घेतला आहे. तसेच वीजविलाच्या थकबाकीतही सवलत मिळवून ते हप्त्याने भरण्याची मुभा मिळवून घेतली आहे. त्याचप्रमाणे थकबाकीचा पहिला हप्ताही सातपुडा साखर कारखान्याने भरून दिला आहे. परिणामी या उपसासिंचन योजना सुरु होतील व शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल अशी आशा पल्लवित झाली होती. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
उपसासिंचन योजना कार्यान्वित होत आहेत या आशेने शहादा तालुक्यातील शिरूड व परिसरातील गावातील शेतकऱ्यांनी उपसासिंचन योजनेपासून आपल्या शेतापर्यंत पाईपलाईनही टाकली आहे. शिरूड येथील राहुल पाटील या युवा शेतकऱ्याने तर सुमारे ९ किलोमीटर पाईपलाईन केली असून त्यासाठी त्याने सुमारे २२ लाख रुपये खर्च केले आहे. त्याने हा खर्च पूर्णपणे कर्ज काढून केलेला आहे. या सारख्या अनेक शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्याही प्रचंड खर्च करून पाईपलाईन करण्यास सुरुवात केलेली आहे. काही शेतकऱ्यांनी पाईपलाईन टाकूनही घेतल्या आहेत. त्यांचाही लाखो रुपयांचा खर्च झालेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षा आहे, की यंदा बॅरेजचे पाणी उपसासिंचनाच्या माध्यमाने त्याच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचून त्यांच्या शेतीला जीवदान मिळेल.
उन्हाळा संपत येऊन पावसाला लागण्याची चाहूल लागली आहे. मात्र तापीनदीवरील उपसासिंचन योजना दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण होताना दिसत नाहीत, त्या उपसासिंचन योजनांना विज जोडण्याही देण्यात आलेल्या नाहीत. या योजना यंदा सुरु होतील याची शास्वती शेतकऱ्यांना नाही. या योजनांच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पाईपलाईनसाठी आपल्या डोक्यावर लाखो रुपयांचा कर्जाचा बोजा चढवून घेतलेला आहे. या योजना सुरु झाल्या नाहीत तर शेतकऱ्यांच्या जमिनी कोरड्या राहणार आहेत, असे झाले तर शेतकऱ्यांपुढे आत्महत्या शिवाय पर्याय राहणार नाही. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ शकते. परिसरात पाण्याची व्यवस्था नसल्याने परिसर कोरडा पडत चालला आहे, परिणामी चारा टंचाईही निर्माण होते आहे. त्याच प्रमाणे गुरांना पिण्याचा पाण्याचाही प्रशन निर्माण झाला आहे.