नंदुरबार Nandurbar Child Death : नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे. 70 टक्के लोकसंख्या ही आदिवासींची आहे. राज्यात कुपोषित बालकांची संख्या 28 हजार आहे. त्यापैकी 23 हजार बालकं नंदुरबार जिल्ह्यात आहेत असं काही आकडेवारी सांगते. नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न गंभीर आहे. मागील तीन महिन्यात 179 बालमृत्यू झाले असल्याचे धक्कादायक आकडे समोर आले. या बालमृत्यूला राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी केलाय.
रिक्त पदे आणि अपूर्ण सुविधा : नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आणि बालमृत्यूची समस्या गंभीर आहे. जिल्हा रुग्णालयात असलेल्या सुविधा अपूर्ण आहेत. जिल्हा रुग्णालयात असलेल्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात 20 जागांची क्षमता असताना 84 बालक उपचार घेत आहेत, असा गंभीर प्रकार आमदार पाडवी यांनी समोर आणलाय. जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदं आणि अपूर्ण सुविधा यामुळं जिल्ह्यातील बालमृत्यूचं प्रमाण वाढलं, असा आरोपही पाडवी यांनी केलाय.
मृत्यूच्या प्रमाणात वाढ : जिल्ह्यात कुपोषणावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीनं विविध उपाययोजना केल्या जात आहेत. बालमृत्यूचं मुख्य कारण म्हणजे बाळाचं वजन कमी होणं. त्याचबरोबर शून्य ते 28 दिवस वयातील बालकांचा जास्त प्रमाणात मृत्यू झालाय. यात सर्वाधिक मृत्यू हे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात झाले आहेत, असं समोर आलंय. दोन्ही तालुके अतिदुर्गम भागात असल्यानं रस्त्यांअभावी संपर्क साधताना खूप अडचणी निर्माण होतात. त्यामुळं ॲम्बुलन्स पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर नेटवर्क नसल्यामुळं संपर्क देखील होत नाही. यामुळं संपर्क होताना उशीर होत आहे, परिमाणी वैद्यकीय सुविधा वेळेत उपलब्ध होत नाहीत. या कारणांमुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झालीय, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय.
कुपोषण आणि बालमृत्यू : नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आणि बाल मृत्यू कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं विशेष उपाययोजना करण्यात येतेय. आरोग्य विभागाच्या वतीनं विशेष तपासणी मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय. जिल्ह्यातील अंगणवाडी बालकांच्या उपोषणासाठी विशेष मोहीम घेण्यात आलीय. तसंच अशा सेविका आणि आरोग्य विभागामार्फत बालकांची विशेष तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी डॉ. खत्री यांनी दिलीय.
हेही वाचा :
- Mothers Day 2023: मेळघाटात मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी राबवला जात आहे 'हा' अभिनव उपक्रम
- नवजात बालमृत्यू प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - भाजप गटनेते प्रभाकर शिंदे
- Child Death In Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात तीन महिन्यात दगावले 179 नवजात बालकं, आता सुरू केलं 'लक्ष्य 84 डेज मिशन'