नंदुरबार - नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील वीज तंत्रज्ञाचा कुजलेल्या अवस्थेत घरात मृतदेह आढळला आहे. घरातून दुर्गंधी येते असल्याने आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी येऊन मृतदेह ताब्यात घेतला.
महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग (महावितरण) कंपनीच्या नवापूर उपविभागांतर्गत खांडबारा येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले योगेश मुरलीधर वाघ (वय ३५ रा. सतीचे वडगाव ता. भडगाव जि. जळगाव) हे गेल्या चार वर्षांपासून तंत्रज्ञ म्हणून नोकरीत कार्यरत होते. ते खांडबारा येथील बर्डीपाडा येथे एकटेच भाड्याने खोली घेऊन राहत होते. गेल्या महिनाअखेर पासून ते कामावर गैरहजर होते. 13 मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास महावितरण विभागाचे लिपिक शरद कोकणी, शेजारी राहणारे मोबीन शेख जैनुल अबेदिन, मुख्य तंत्रज्ञ राजाराम वाघ यांनी योगेशच्या घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे दरवाजा ढकलून खिडकीद्वारे पाहिले असता योगेशचा मृतदेह खाटेवर फुगलेल्या व कुजलेल्या अवस्थेत पडलेला दिसला. त्यांनी खांडबारा दूरक्षेत्र पोलीस ठाण्यातील पोलिसांना कळविले. खांडबारा दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणेंसोबत घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश चित्ते, अनिल राठोड, अतुल पान-पाटील, विजय वळवी, प्रविण अहिरे, तुषार पाडवी घटनास्थळी आले.
मृत योगेश वाघ यास दारूचे व्यसन होते. तीन दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. खांडबारा ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य योगेश चौधरी यांच्या सहकार्याने मृतदेह दवाखान्यापर्यंत नेण्यात आला. खांडबारा ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी संदिप वळवी यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.
योगेशच्या मृत्यूचा निरोप देण्यासाठी कुटुंबीयांना महावितरण विभागाचे कर्मचारी, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने संपर्क साधला. मात्र, त्यांच्या परिवारातील सदस्यांनी कोरोना पार्श्वभूमी दाखवत येण्याचे टाळले. माणुसकी धर्म पाळत ग्रामपंचायतीच्या नियमाप्रमाणे खांडबारा ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, महावितरणचे त्यांचे सहकारी, खांडबारा व विसरवाडी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.