नंदूरबार - आदिवासी समाजावर अन्याय झाल्यास अथवा आदिवासी समाजावर वेगळे आरक्षण लादण्याचा प्रयत्न केला गेला तर गावित कुटुंबीय हे समाजाच्या बाजूने उभे राहतील, असा इशारा भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी भाजपला दिला आहे. ते आज नंदूरबार येथे पत्रकारांशी बोलत होते. वेळ प्रसंगी पक्ष आणि पदाचाही त्याग करायला तयार असल्याचेही गावित यावेळी म्हणाले.
आदिवासी समाजाप्रमाणेच धनगर समाजाला सुविधा देण्याच्या निर्णयाबाबत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा विपर्यास केला जात असल्याचेही सांगितले. आदिवासींच्या आरक्षणाला आणि सेवा सुविधांना तसेच आरक्षित निधीला कुठल्याही प्रकारचा तडा न जाऊ देता मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला सुविधा दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे आदिवासी समाजाच्या हितावर कोणतेही परिणाम होणार नसल्याचे, डॉक्टर गावित यांनी यावेळी स्पष्ट केले.
आदिवासी समाजासाठी आरक्षित निधी हा सुरक्षित असून त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का सरकारने लावला नाही. विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे अपप्रचार केला जात असल्याचा आरोप आमदार गावित यांनी यावेळी केला आहे.