नंदुरबार - देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांना फटका बसला आहे. त्यातच नियोजित अनेकांचे विवाह रद्द झाले आहेत. अशा स्थितीत तळोदा तालुक्यातील बोरद येथे मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत गौरव आणि सविताचा विवाह पार पडला.
बोरद येथील रविंद्र झुलालसिंह राजपूत यांचे चिरंजीव गौरव व धुळे जिल्ह्यातील नाणे येथील दुभानसिंह नथेसिंग राजपूत यांची कन्या सविता यांचा विवाह मोजक्या वर्हाडींच्या उपस्थितीत विवाह झाला. बोरद येथील पुण्यपावन मंदिरात झालेल्या या विवाह सोहळ्याला उपस्थित मोजक्या वर्हाडींनी सोशल डिस्टन्सिंचेही पालन केले. वर गौरव हा उच्चशिक्षित असून सुरत येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. तर, वधू सविताही उच्च शिक्षित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन न करता साध्या पध्दतीने हा विवाह करण्यात आला.
या वेळी, पंचायत समिती सदस्य विजय राणा यांनी नव-दाम्पत्यास 11 हजारांचा धनादेश दिला. याप्रसंगी सरपंच वासंतीबाई नरहर ठाकरे, उपसरपंच रंजनकोर राजपूत, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, गणेश मराठे, गणेश गुुुरव उपस्थित होते.
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असून पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार बोरद येथे संपूर्ण सुरक्षित अंतर ठेवत हा विवाह सोहळा संपन्न झाला. भविष्यात देखील हा विवाह सोहळा आदर्श मानून खर्चिक बाबींचा विचार करून साध्या पध्दतीने येणार्या पिढीने विचार करावा. अशाच पद्धतीने आणखी दोन विवाहही पुढील महिन्यात लावण्याचे नियोजन आहे.