नंदुरबार: गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला नवापूर तालुका राष्ट्रीय महामार्गावरुन दररोज शेकडो गाड्या वाहतात. भर पावसाळ्यात सरपणी नदीवरील पूल वाहून गेल्याने अनेकदा वाहतूक ठप्प झाली होती. संबंधित ठेकेदाराकडून पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत केली जात होती. मात्र आता परतीच्या पावसात खोकसा गाव परिसरात असलेल्या पाटी नदीला पूर आल्याने पुल वाहून ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून मार्गस्थ व्हावे लागत आहे. परिसरातील दळणवळण ठप्प झाले आहे. पर्याय पुलाची तात्पुरती दुरूस्ती करून छोटे वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे.
पूल पाण्यात वाहून गेल्याने 10 गावांचा संपर्क तुटला नवापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात आल्याने नदी नाल्यांना पूर आला होता. नवापूर तालुक्यातील खोकसा-चिंचपाडा या रस्त्यावरील पर्यायी पूल पाण्यात वाहून गेल्याने 10 गावांचा संपर्क तुटला आहे. या भागातील ग्रामस्थांना भर पाण्यातून जीव धोक्यात घालून मार्गस्थ व्हावे लागत होते. मोठ्या प्रमाणात पहाडी भागात परतीचा पाऊस आल्याने पाटी नदीला पूर आला होता.
या पूरामध्ये मातीचा कच्चा रस्ता वाहून गेल्याने दळणवळण ठप्प झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाटी गावाजवळ नवीन पुलाचे काम मंजूर झाले होते. नवीन पुलाचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 8 दिवसांपूर्वीच जुना पूल तोडून शेजारी वाहतुकीस पर्यायी मातीचा पूल तयार करण्यात आला होता. परतीच्या पावसाने पुल पाण्यात वाहून गेल्याने 10 गावांचा संपर्क तुटला आहे.
या गावांचा संपर्क तुटला खोकसा- चिंचपाडा दरम्यान असलेल्या पाठी नदीला पूर आल्याने पूल वाहून गेल्याने परिसरातील करंजी, पिंप्राण, खोचापाडा, बोरपाडा, कामोद, खोकसा, दापूर, कोटखांब, भोंमदीपाडा आदी गावांचा समावेश होतो. या भागातील ग्रामस्थांना चिंचपाडा व विसरवाडी बाजारात, दवाखान्यात व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. या भागातील दळणवळण ठप्प झाले होते. नाईलाजाने नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत होती. तर वाहनांना फेरा मारून मार्गस्थ होण्याची वेळ देखील आली होती. एका दिवसानंतर पुन्हा मातीचा भराव करून पुल तयार करण्यात आला आहे. छोट्या वाहनांसाठी दळणवळण सुरू झाले आहे. पुन्हा समस्या जैसे थे होणार नाही. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले तर ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न देखील निर्माण झाला होता.
परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान नवापूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात सोयाबीन सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कृषी विभागातर्फे त्वरित पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.