नंदुरबार - जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामातील सर्वच पिकांचे संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात कपाशी व ज्वारी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. नुकसानग्रस्त पिकांची त्वरित पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्यांकडून करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. आठ दिवस संततधार पावसामुळे कापूस, ज्वारी, मूंग, उडीद, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी काळी पडली आहे. तर शेतात पाणी साचून राहिल्याने कापसाची बोंडे खराब होण्यास सुरुवात झाली आहे. तर शेतात पाणी साचून राहिल्याने पपई आणि मिरचीच्या पिकांवर बुरशीजन्य रोगांचे प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे 11, 242 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे चार हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. या संततधार पावसाच्या 27 हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्यांच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्यांनी नुकसानीची पाहणी न केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.