नंदुरबार - जिल्ह्यासह परिसरातील शेतकरी चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. चोवीस तारखेपर्यंत जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने पेरण्या देखील खोळंबल्या होत्या. मात्र, सोमवारी सकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सर्वत्र पहिल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.
जिल्ह्यातील अक्कलकुवा धडगाव नंदुरबार या तालुक्यात कमी पावसाची नोंद आहे. तर, तळोदा शहादा आणि नवापूर तालुक्यात पावसाच्या चांगल्या सरी बरसल्या आहे. जिल्ह्यात एकूण 101.00 मीमी पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाद्वारे देण्यात आली आहे. या दमदार पावसामुळे दुष्काळी भागात शेतकऱ्यांना आणि नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.
आता पेरणीच्या आणि मशागतीच्या कामांना गती येणार आहे. परंतु, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अजून काही दिवस पावसाने सातत्य ठेवले तर चाऱ्याचा प्रश्नही मिटेल. दमदार पावसामुळे शेतकर्यांच्या अपेक्षा वाढल्या असून यावर्षी तरी वरुणराजाने मोठी कृपा करून चांगला पाऊस द्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.