नंदुरबार - शहरातील जुना बैल बाजार परिसरात पतंग उडविण्याच्या कारणावरुन वाद होवून दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली. यात एकाचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिसाहब मोहल्ला जुना बैल बाजार परिसरात दोन गटात लहान मुले पतंग उडवित होते. यादरम्यान, त्यांचा एकमेकाशी वाद झाला. याचा राग मनात धरत, 12 सप्टेंबर रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास दोन्ही गटातील मोठ्या लोकांनी लोखंडी पाईप, लाकडी डेंगारे व हाताबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली. यात एकाचा मृत्यू झाला.
लियाकत शाहिद बागवान यांनी या प्रकरणीत तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, पतंग उडविणार्यावरुन वाद झाला. तेव्हा संशयितांनी शिवीगाळ केली. तसेच लाठ्याकाठ्या, लोखंडी पाईपने मारहाण केली. इतकेच नव्हे तर घरावर दगडफेक करुन आयशाबी शाहिद बागवान, हारुन युसूफ कुरेशी, सायराबी हारून कुरेशी यांना मारहाण केली. यावेळी काही जण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही संशयितांनी मारहाण केली. या मारहाणीत हारुन युसूफ कुरेशी यांच्या छातीवर दगड लागल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शाहरुख कलिम पटवे, नईम कलिम पटवे, सलिम कलिम पटवे, अल्तमश कलिम पटवे, मोहसीन कलिम पटवे, अलिशान पटवे, नाजीम कलिम पटवे, अत्तार शेख सलमान, मुन्ना इसाक पटवे, कलिम पटवे, सना फिरोज पटवे, नुशरत मुन्ना पटवे या 12 जणांविरुध्द भादंवि कलम 302, 307 व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दुसरी परस्परविरोधी तक्रार शेख कलिम शेख कासम पटवे यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, पतंग उडविण्याच्या कारणातून संशयितांनी लोखंडी पाईप, लाकडी डेंगार्याने डोक्यावर मारहाण करुन मोहसीन यास जखमी केले. तसेच कलिम शेख यांच्या पत्नीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या प्रकरणी अरबाज, समीर, युनूस व अन्य एक, लियाकत बागवान, हारुनची पत्नी, बहिणी व एक जण अशा 7 जणांविरुध्द भादंवि कलम 307, 452, 324, 323, 143, 147, 149, 109, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवटे व पोलीस उपनिरीक्षक प्रविण पाटील करित आहेत.