नंदुरबार - नवापूर प्रादेशिक कार्यालयात ऑनलाईन कॅम्पचे आयोजन करण्यात येते. या कॅम्पमध्ये 200 पेक्षा अधिक वाहनांची पासिंग आणि पाचशेहून अधिक वाहन परवाने दिले जातात. मात्र, सर्व्हर डाऊन असल्यामुळे याठिकाणी वाहन पासिंग व वाहन परवान्यासाठी ग्राहकांना तासंतास थांबून राहवे लागत आहे.
लवकर नंबर लागावा म्हणून ग्रामीण भागातील वाहन चालक आपली सगळी कामे सोडून दुपारपर्यंत रांगेत उभे राहात आहेत. तसेच दलालांचा विळखा पडला आहे. त्यामुळे परवाना, पासिंग करण्यासाठी येथे वाहनधारकांना दलालांचीच मदत घ्यावी लागते. कमी किमतीत होणारी कामे दलाल अव्वाच्या सव्वा रुपये घेऊन करत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
कॅम्पमधील दलालांना बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. नवापूरच्या मासिक कॅम्पमध्ये नवीन वाहनांची पासिंग, वाहन चालविण्याचा कच्चा आणि पक्का परवाना, नवीन गाड्यांचे रजिस्ट्रेशन आदी कामे केली जातात.
नवापूर शासकीय विश्रामगृहाच्या आवारात दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गुरूवारी आरटीओ कॅम्प आयोजित केला जातो. यामुळे तालुक्यातील शेकडो गावातील नागरिकांना आरटीओशी संबंधित इतर कामे येथे करणे सहज शक्य होत आहे. शहरवासी आणि तालुक्यातील गरजूंना एक चांगली सुविधा निर्माण झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत होते. मात्र ऑनलाईन नेटवर्किंग समस्या, अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता तसेच दलालांचा सुळसुळाट वाढल्याने उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.