नंदुरबार - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला 'जतना कर्फ्यू'ची हाक दिली आहे. देशभरात हे आवाहन पाळण्यात येणार असून, नंदुरबार जिल्ह्यातही आज बस सेवेसह सर्वच व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासनाकडून नगरपालिका, ग्रामपंचायती अशा सर्वच स्तरावरुन जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केली आहे. बिरसामुंडा सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा - मोदींच्या आवाहनाला लोकांनी दिला प्रतिसाद, 'टाळ्या अन् थाळ्या' वाजवण्याचा केला सराव
भारूड म्हणाले, कर्फ्युच्या पालनासाठी सकाळी सात वाजल्यापालून टेहळणी पथक कार्यरत राहून अंमलबजावणी करणार आहे. म्हणून नागरीकांनी स्वेच्छेने जनता कर्फ्युमध्ये सहभागी व्हावे. तसेच जगभरात कोरोना विषाणूने थैमाने घातले असून, त्याच्याशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधानांनी आवाहन केले आहे. याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असून नगरपालिका व ग्रामंपचायतीं मार्फत ठिकठिकाणी कोरोनाबाबत जनजागृती व जनता कर्फ्युची माहिती देण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात बाहेर गावाहून आलेल्या 19 जणांची दक्षता म्हणून तपासणी करण्यात आली असल्याचेही भारूड यांनी यावेळ सांगितले. तसेच आज रविवारी जनता कर्फ्युसाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच व्यवहार बंद राहणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवा देखील पूर्णतः बंद राहतील. तर खासगी बसेस आल्यास त्या जिल्हाहद्दीपर्यंत येवून तेथे तपासणी करण्यात येणार आहेत. खाजगी प्रवासी वाहनांना रविवारच्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या एका दिवसाच्या जनता कर्फ्यूनंतर 31 मार्चपर्यंत दारु विक्रीची दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि अनावश्यक ठिकाणीची सुरू असलेली दालने बंद ठेवण्याचा निर्णय असल्याचे भारूड म्हणाले.
भाजीपाला, किराणा, औषध विक्री दुकाने अशी जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने 31 मार्चपर्यंत सुरू राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. कोरोनाबाबत कुणी अफवा पसरविल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये. जनता कर्फ्यूमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही भारुड यांनी यावेळी केले.