नंदुरबार - जिल्ह्यातील सर्व लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये 100% जलसाठा जमा झाला आहे. जिल्ह्याला गेल्या चार वर्षापासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत होता. गेल्या काही दिवसांत पडणाऱ्या पावसामुळे विविध प्रकल्पांमधला जलसाठा वाढला आहे. यामुळे नागरिकांना सतत भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या दूर झाली आहे.
जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस झाला आहे. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यंदा वरूण राजाच्या कृपेने जिल्ह्यातील सर्व 37 लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे. प्रकल्पांमध्ये दिवसेंदिवस पाणीसाठा वाढतच आहे. जिल्हा प्रशासनाने जमा झालेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून पिण्यासाठी आणि शेती सिंचनासाठी उपयोगात आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.