नंदुरबार - जिल्ह्यातील आदिवासी बहुल आणि दुर्गम भागात नर्मदा काठावरील गावांमध्ये बिकट परस्थिती आहे. जिल्ह्यातील या भागातील गावापर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीत. यामुळे नर्मदेच्या विस्तीर्ण पात्रातून बोटीने प्रवास करत गावांपर्यंत पोहोचता येते. गावात मोबाईलला रेंज नाही आणि वीज सुद्धा नाही. धडगाव तालुक्याचे तहसीलदार आणि नर्मदा नदीत गस्त घालत असलेले पथक बोटीने शासकीय मदत घेऊन पोहोचत आहे. त्यांनी या भागातील गावात जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले.
धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नर्मदा काठच्या गावांमध्ये प्रशासनाच्यावतीने नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा व जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या तीन राज्यांच्या सीमेलगत नर्मदा काठावर अतिदुर्गम भागात भूषा, उडद्या, भादल, भाबरी आदी गावांमध्ये धडगावचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे व उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्या उपस्थितीत शासनाच्या वतीने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे या भागात पहिल्यांदाच प्रशासन पोहोचले आहे. धडगाव तालुक्यातील हा अतिदुर्गम भाग असल्यामुळे येथे दळणवळणाची सोय नाही परिणामी या भागात अभावानेच प्रशासन पोहोचते. अशा परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रशासनाने त्यांना महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. बहुतांश गावांमध्ये जाण्यासाठी बोटीने जावे लागते. सरदार सरोवर प्रकल्पातील बाधित अनेक प्रकल्पग्रस्त या भागात अद्यापही वास्तव्यास आहेत. प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंसोबत औषधोपचाराचे साहित्य दिले आहे.
तहसीलदार आणि आलेल्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना धान्य वाटप केले मुलांना बिस्कीट आणि मास्क दिलेत त्यांना मिळालेली मदतीची माहिती देण्यासाठी प्रत्येक वेळी प्रतिक्रियेची गरज नसते माणसाच्या चेहऱ्यावरील समाधान ही त्याची बोलकी प्रतिक्रिया असल्याचे मत तहसीलदार सपकाळ यांनी व्यक्त केले.
अतिदुर्गम भागात राहणारा आदिवासी बांधव निसर्गप्रेमी असला तरी तो कोरो ना सोबत दोन हात करण्यासाठी तयार आहेत दुर्गम भागात कोरो ना माहीत नसला तरी कसली तरी महामारी आली असल्याचे सांगत काळजी घेत आहेत.