नंदूरबार - ज्या सावरकरांनी क्रांती काय असते हे दाखवून दिले त्याच सावरकरांबद्दल काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात त्यांच्याबद्दल अश्लील लेख लिहिला आहे. असे असतानाही सत्तेसाठी लाचार झालेली शिवसेना मात्र, मूग गिळून गप्प बसल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. आपण असतो तर सावरकरांसाठी सत्तेला लाथ मारुन सत्तेतून बाहेर पडलो असतो, असेही फडणवीस म्हणाले.
तळोदा तालुक्यातील बोरगाव येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टिका केली. या सभेला तालुक्यातील गटातील व गणातील उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मध्य प्रदेशच्या काँग्रेस युनिटने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात सावरकर समलिंगी असल्याचा अश्लील लेख लिहला आहे. यावरुन फडणवीस यांनी काँग्रेससह शिवसेनेवर निशाणा लगावला.
शिवसेनेचा वाघ मांजर झाला
शिवसेनेचा वाघ कालपर्यंत मातोश्रीवरुन डरकाळी फोडत होता. आता मात्र. त्यांची मांजर झाली असून तो म्याव-म्याव करत दिल्लीच्या मातोश्रींच्या दिशेने जात असल्याचे फडणवीस म्हणाले. निवडणुकांआधी भाजपासोबत युती करणाऱ्या शिवेसनेने जनतेच्या विश्वासघात करत हे बेईमानीचे सरकार स्थापन केले असून, भारतातील राजकीय इतिहास पाहता हे बेईमानी करुन आलेले सरकार ६ महिन्यांच्या वर टिकणार नाही. पुन्हा भाजपचेच सरकार राज्यात येईल असा विश्वास देवेंद्र फडवणीस यांनी व्यक्त केला. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि बोरद अशा दोन ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या भाजप उमेदवार प्रचारार्थ त्यांची सभा झाली.