नंदुरबार - गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, हवामान खात्याने जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. नंदुरबार शहर आणि परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या त्यामुळे मिरची व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिरचीला पावसाचे पाणी लागल्याने मिरची काळी पडते. मिरची पथारीवर हजारो क्विंटल मिरची वाळण्यासाठी टाकण्यात आली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिकांना फटका बसला आहे. अजून तीन ते चार दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहील आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे संपूर्ण गहू आडवा झाला आहे. तसेच या पावसाचा हरभरा पिकाला देखील मोठा फटका बसला आहे.
मिरची व्यापारी पुन्हा संकटात
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मिरचीचे मार्केट आहे. व्यापाऱ्यांनी घेतलेला माल सुकवण्यासाठी पथाऱ्या लावल्या जातात. गेल्या महिन्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ते भरून निघत नाही, तोवरच आज झालेल्या जोरदार पावसामुळे व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली असून, सुकविण्यासाठी टाकण्यात आलेली मिरची ओली झाली आहे. आता ही ओली झालेली मिरची काळी पडण्याची शक्यता आहे. नंदुरबार शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मंगळ बाजार परिसरातील भाजी मार्केटमध्ये देखील पाणी शिरले आहे.