नंदुरबार - विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शहरात आणि जिल्ह्यात विजेच्या बिलांचे वाटप करण्यात आले आहे. वाढीव वीज बिल आल्याने संतप्त नागरिकांनी नंदुरबार शहरातील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात गोंधळ घातला. नागरिकांनी अव्वाच्या सव्वा बिल आल्याचे सांगितल्यावर विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
जिल्ह्यात वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज बिल वाटप करण्यात आले आहे. तीन महिन्यांपासून लाॅकडाऊन असल्यामुळे वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रिडींग न घेता मागील रीडिंगनुसार तीन महिन्यांचे बिल अदा केले होते. मात्र, आता विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन रीडिंग घेतल्यानंतर वीज बिल जास्तीचे आले असल्याने नागरिकांनी वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन एकच गोंधळ केला.
अखेर नागरिकांची समजूत काढण्यात विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यशस्वी झाले असून त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्यावर बिल पडताळणी करण्याचे आश्वासन दिले. मात्र, दिवसभर विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या परिसरात वीज ग्राहकांची मोठी गर्दी पाहण्यास मिळाली आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही लावण्यात आले असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.