नंदुरबार - नर्मदेकाठच्या गावात पिंजऱ्यातील मत्स्यपालनामुळे गरीब आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे साधन मिळाले आहे. आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात नर्मदा काठावरील दुर्गम अशा मणिबेली, चिमलखेडी, भुषा, चिचखेडी आणि शेलगदा येथे पिंजऱ्यातील मत्स्यपालनामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून या मत्स्य कास्तकारांना सरदार सरोवर प्रकल्प नर्मदा विकास विभागामार्फत अर्थसहाय्य करण्यात येत आहे.
उपजिविकेसाठी डोंगराळ भागात शेती -
धडगाव व मोलगीप शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर नर्मदा नदी किनारी असलेल्या 33 प्रकल्पग्रस्त गावातील शेतकरी उपजिविकेसाठी डोंगराळ भागात शेती करतात. पावसाळ्यात आलेल्या पिकावर वर्षभरासाठी अन्न साठवून ठेवायचे एवढ्यापूरती शेती मर्यादीत आहे. ज्वारी, भगरची शेती केल्यावर आवश्यकतेपुरते पीक हाताशी येते. दुसरे कोणतेच उत्पन्न नसल्याने खरीप हंगामानंतर कामाच्या शोधात ही मंडळी शहराकडे जातात.
मत्स्यपालन मुळे मिळाल्या जोड व्यवसाय -
दुर्गम आणि डोंगराळ भाग असल्याने शेतीसाठी इतर सुविधा उभ्या करणेदेखील कठीण आहे. त्यामुळे शेती व्यवसायाला या भागात एकंदरीतच मर्यादा आहेत. मात्र आता त्याला मत्स्यपालनाची जोड मिळाल्याने उत्पन्न वाढण्याची आशा निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केला प्रयोग -
पाच गावातील 433 शेतकऱ्यांनी मिळून 5 मच्छिमार सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत. शेलगदा येथील नर्मदा नवनिर्माण सहकारी मासेमारी संस्था यातीलच एक आहे. संस्थेच्या प्रत्येक सदस्याची आर्थिक परिस्थिती जेमतेमच आहे. संस्थेला मत्स्य व्यवसाय विभाग व नर्मदा विकास विभागामार्फत 45 लक्ष 60 हजार रुपये किमतीचे 48 तरंगते पिंजरे खरेदी करून देण्यात आले.
हेही वाचा - जाणून घ्या, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची कारणे
मत्स्य पालनातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न -
मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक खाद्य, औषधे आदींची माहिती दिली, तसेच केंद्रीय मत्स्य महाविद्यालय वर्सोवा मुंबई यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे माशांचे चांगले उत्पादन झाले. आतापर्यंत शेलगदा येथे 25 लाख उत्पन्न मिळाले असून अद्याप 26 पिंजऱ्यातील माशांची वाढ होत आहे. मासा साधारण एक किलोपेक्षा अधिक वजनाचा झाल्यावर त्याला विक्रीसाठी बाहेर काढण्यात येते.
बोटीतून गुजरात राज्यात माशांची विक्री -
माशांची विक्री करण्यासाठी मोठ्या बाजाराचा शोध घेण्यात येत आहे. 4 संस्थांना शितवाहन पुरवठा करण्यात आला आहे. बोटीने गुजरात राज्यात नेऊन विक्री करण्याचे प्रयत्न झाले. बाजारापर्यंत ताजी मासळी नेण्यात येत आहे. पहिल्याच वर्षी मिळालेल्या चांगल्या उत्पन्नामुळे शेतकऱ्यांची आशा वाढली आहे. सर्वजण एकत्रितपणे चांगले प्रयत्न करीत आहेत. हा व्यवसाय शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरणारा आहे.
शासनाने दिलेल्या मदतीच्या हातामुळे परराज्यातील भटकंती थांबली -
आधी पोटापुरती शेती करायचे. त्यातून खूप कमी प्रमाणावर उत्पन्न मिळायचे. वर्षभर घर चालवणे देखील मुश्कील व्हायचे. कामासाठी परराज्यात जावे लागत होते. घरदार सोडून परिवार सोडून घरापासून लांब राहावे लागत होते. मात्र, शासनाच्या सहकार्याने मासेमारीसाठी पिंजरे मिळाल्याने 25 लाखापर्यंत संस्थेला उत्पन्न मिळाले. आणखी मत्स्यबीज टाकल्याने उत्पन्न वाढेल व कामानिमित्त भटकंती थांबली असल्याची माहिती मुरजी शित्या पाडवी (रा. शेलगदा) यांनी दिली.
मत्स्य व्यवसाय विभागाची मदत -
मत्स्य व्यवसाय विभागातर्फे आदिवासी बांधवांना 5 संस्थांना प्रत्येकी 48 पिंजरे, 20 बिगर यांत्रिकी नौका, दोन यांत्रिकी नौका, प्रत्येक सभासदाला एक शितपेटी आणि 5 किलो नायलॉन जाळी उपलब्ध करून देण्यात आले आहे. आणखी 10 संस्थांना पिंजरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थलांतर रोखण्यास मदत होईल.