नंदुरबार - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्ह्यात अनेक नवीन राजकीय समीकरणे उदयास आली आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात महाआघाडी तयार झाली असली तरी नवापूर तालुक्यात महाआघाडीचे भवितव्य धोक्यात आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी आघाडी झाली असून त्यांच्यात ५०-५० फॉर्मुला ठरल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. नवीन समिकरणांच्या उदयामुळे सामान्य कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नवापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे १० गट तर, पंचायत समितीचे २० गण आहेत. यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली असून त्यांच्यात जागांचे वाटपही झाले आहे. भाजपचे विधानसभा निवडणूक लढवलेले नेते भरत माणिकराव गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार शरद गावित यांनी या आघाडीची घोषणा केली आहे. नावापूर तालुक्याप्रमाणे जिल्ह्यात अनेक जगांसाठी भाजप आणि राष्ट्रवादी यांची छुपी आघाडी असल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून येत आहे.
हेही वाचा - अहमदनगर झेडपीच्या अध्यक्षपदासाठी महाविकासआघाडी-भाजपमध्ये रस्सीखेच; आज बैठकांचा सिलसिला
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वबळाची भाषा करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेत सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने एक नवीन राजकीय खेळी खेळल्याचे पाहायला मिळत आहे. काही जागांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा कुटुंबातील सदस्यच भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे आरोपही केले जात आहेत. मत विभाजन टाळण्यासाठी या पक्षांनी हात मिळवले असले तरी, चौरंगी आणि तिरंगी लढतीचा परिणाम मतविभाजनावर होईल. अनेक अपक्ष उमेदवार असल्याने ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे.