नंदुरबार - सूर्यकन्या तापी नदीला जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी सुरक्षीत अंतर राखून पूजन केले. यावेळी साडीचोळीचा आहेर अर्पण करण्यात आला. यावेळी संगमेश्वर नदी ठिकाणी भाविक जमले होते. नंदुरबार जिल्ह्यातील प्रती काशी म्हणून, ओळख असलेल्या तापी नदीला खान्देशची जीवनदायिनी असे म्हणतात. खान्देश समृद्ध करण्यासाठी तापीनदीचा मोठा वाटा आहे.
तापी नदीने या भागात केवळ शेतीच जगविली नाही तर येथील समाज जीवन सुद्धा जगविले आहे. याचे ऋण फेडण्यासाठी परिसरातील महिला भाविकांनी तापी नदीच्या जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला. पहाटेपासून भाविकांनी संगमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी स्नान आणि पूजेसाठी आले होते. दरवर्षी हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात असतो.
तापी नदीमध्ये साडी अर्पण केली जात असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा उत्सवात नागरिकांनी कमी प्रमाणावर सहभाग नोंदविला. यावेळी सुरक्षीत अंतर राखून सर्व नियम पाळत महिला भाविकांनी तापी नदीत स्नान केले. त्यानंतर तापीनदीचे पूजन केले. साडी-चोळीसह सोळा शृंगार अर्पण केला.