नंदुरबार - सरकार स्थापनेसाठी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागल्याने आपल्या दौऱ्याला उशीर झाला, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितले. राज्यपाल दोन दिवसाच्या नंदुरबार दौऱ्यावर आले आहेत. सातपुड्याच्या दुर्गम भागातील भगदरी गावात त्यांनी विविध विकास कामांची पाहणी करून या गावातच मुक्काम केला. सर्वसामान्य आदिवासींपर्यंत सर्व योजना पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
राज्यपालांनी नंदुरबार जिल्ह्यातील भगदरी हे गाव विकासासाठी दत्तक घेतलेले आहे. या गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण केले. मोलगी येथील पोषण केंद्राचे आणि भगदरी येथील आदिवासी संस्कृती भवनाचे त्यांनी उद्घाटन केले. आदिवासी भागातील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी आरोग्य केंद्रांना भेटीही दिल्या.
हेही वाचा - भारताला मोठं करण्यासाठी हिंदुत्वाला मजबूत करण्याची गरज'
गावातील आदिवासी बांधवांनी वीज, आरोग्य यासह विविध समस्या राज्यपालांना सांगितल्या. एका महिन्यात आदिवासींच्या समस्यांचे निवारण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.