नंदुरबार - परप्रांतातील 89 व्यक्तींची खापर येथील विलगीकरण कक्षाच्या ठिकाणी निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. या सर्वांच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर या संर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हाबंदीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार बाहेरील राज्यातील किंवा जिल्ह्यातील नागरिकांची जिल्ह्यात चांगली व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकूण 146 कामगारांची सोय तात्पुरत्या निवाऱ्यात करण्यात आली आहे. गुजरात सीमेकडून जाणाऱ्या कामगारांची खापर येथील व्यवस्था शासकीय मुलींच्या वसतिगृहात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात केली आहे. यात महिला व बालकांचाही समावेश आहे. प्रशासनाने या केंद्रात त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वसतिगृहाच्या 2 इमारतीतील 14 कक्षात ही व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रत्येकाला स्वतंत्र कॉट, सॅनिटायझर, हात धुण्यासाठी साबण, भोजन, नाश्ता, नियमित वैद्यकीय तपासणी अशा सर्व सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. क्वारंटाईन केलेल्या 2 व्यक्तींना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आवश्यकता असल्यास रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रशासनासोबत स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिक देखील मदतीला पुढे सरसावले आहेत. परराज्यात माणूसकीच्या ओलाव्याने या सर्वांना आपलेसे केले आहे. घराची ओढ तर आहेच, पण अनोळखी व्यक्तिचा कुटुंबाप्रमाणे मिळणारा स्नेहदेखील तेवढाच हवासा वाटणारा आहे. अशा भावना विलीनीकरण केंद्रातील कामगारांनी व्यक्त केल्या आहेत.