नांदेड - निर्मल राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याठिकाणी कोणताही धोका दर्शवणारे फलक अथवा कसलाही दिशादर्शक नसल्याने हा अपघात झाल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. किरण राठोड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मागील दोन वर्षांपासून सुरू चौपदरीकरणाचे काम -
निर्मल राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने अनेक ठिकाणी खड्डे केलेले आहेत. त्याठिकाणी बॅरिकेट्स, धोका दर्शवणारे फलक अथवा कसलाही दिशादर्शक लावण्यात आलेले नाहीत. यामुळे प्रवाशांना या मार्गावर मोठी कसरत करावी लागत आहे. किरण हा शुक्रवारी रात्री या मार्गावरून दुचाकीवरून प्रवास करत होता. त्याला पुढे धोका असल्याचे कोणताही फलक दिसला नाही. त्यामुळे खड्यात जाऊन पडला. हा खड्डा तब्बल पंधरा ते वीस फूट खोल आहे. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
दोन वर्षात अनेकांना गमवावा लागला जीव -
हा खड्डा मालेगाव पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर खोदलेला आहे. परंतू, या ठिकाणी कोणतेही दिशादर्शक लावण्यात आलेले नाही. तसेच सुरक्षिततेची कुठलीही उपाय योजना करण्यात आलेली नाही. आजपर्यंत 2 वर्षात अनेकांचे बळी या महामार्गावर गेले आहेत. महामार्गाचे काम संथगतीने तसेच निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे अनेक आंदोलन झाली, त्याचा काहीही फायदा झालेला नाही.
हेही वाचा - विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी...सामनातून काँग्रेसवर 'बाण'