नांदेड - पिंपरखेड तालुक्यातील मुरलीधर पुंडलीक मुळे (वय ३०) या तरुण शेतकऱ्याने बँकेचे थकलेले कर्ज व शेतातील सततची नापिकी याला कंटाळून आत्महत्या केली. शेतातील शेडमध्ये गळफास घेऊन सोमवारी मध्यरात्री आत्महत्या केली.
मुरलीधर मुळे यांनी तीन वर्षांपूर्वी बँकेचे कर्ज घेतले होते. शासनाच्या कर्जमाफीत मुळे यांचा सात-बारा कोरा झाला नाही. शिवाय शेतात सततची नापिकी होती. परिणामी शेतीत तोटा झाला. त्यामुळे मुरलीधर सतत चिंतेत होता. मागील काही दिवसांपासून मुरलीधर त्याच्या मनातील ही सल त्याच्या पत्नीजवळ बोलून दाखवित होता. अखेर सोमवारी मध्यरात्री मुरलीधरने आपली जीवनयात्रा संपविली. मंगळवारी सकाळी त्याचा मोठा भाऊ विकास मुळे गोठ्यातील जनावरांच्या देखरेखीसाठी गेला असता मुरलीधरने गळफास घेतल्याचे दिसून आले.
मागील काही वर्षांपासून शेतमालाच्या किंमतीत सतत घसरण होत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा तोटा वाढत आहे. दहा वर्षांपूर्वीचे भाव आजही जैसे थे आहेत. त्यातच जून महिना पूर्ण संपला तरी अद्यापही तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झाला नाही. जर आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर वसुली कशी होणार, त्यामुळे कृषी सेवा केंद्रावरून मिळणारी उधार खते, बियाणे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे आणि याचाच बळी मुरलीधर पडला आहे.
याप्रकरणी मनाठा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आली. तलाठी के.एन. पाईकराव व जमादार श्याम वडजे यांनी पंचनामा केला. मयत मुरलीधर पुंडलीक मुळे यांच्या पश्चात वडील, भाऊ, भावजय, पत्नी, व एक मुलगी आहे.