नांदेड- केवळ २० दशलक्ष घनमीटर पाण्यावर वर्षभराचे नियोजन मनपाने केले आहे. यावरून महापालिकेच्या यंत्रणेला जिल्हाधिकाऱ्यांनी खडसावले होते. मात्र तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करुन शहराचा पाणीपुरवठा चार दिवसा ऐवजी पुन्हा ६ दिवसाआड करण्याचे मनपाने जाहीर केले आहे. तिकडे जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र बारा बंधाऱ्यांमध्ये तब्बल ३२२ दशलक्ष घनमीटर पाणी भरल्यानंतरच विष्णूपुरीत पाणी येणार आहे. मात्र, त्यापुर्वीच नियोजनात बदल करणे, योग्य नसल्याचे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे समजते.
राज्यात मराठवाडा व विदर्भ वगळता इतरत्र चांगला पाऊस झाला. मागच्या आठवड्यात मराठवाड्यात पिकांना जीवदान देण्याइतका पाऊस पडला असला तरी नंतर पावसाने पाठ फिरवली. नांदेडच्या विष्णुपूरी प्रकल्पावर शहराचा ९० टक्के पाणीपुरवठा अवलंबून आहे. गेल्या जानेवारी महिन्यापासून नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. मार्चनंतर ही समस्या अधिक तीव्र झाली. मनपाने तीन दिवसाआडचा पाणीपुरवठा सहा दिवसाआडपर्यंत नेला असला, तरी सध्या दहा ते बारा दिवसआड पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेशे पाणी मिळत नाही. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी पाणीप्रश्नावर जाब विचारल्यानंतर महापौरांनी चारदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले.
बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेतही अधिकाऱ्यांनी त्यास संमती दिल्यानंतर आयुक्तांनी चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले होते. परंतु, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना ही बाब कळताच त्यांनी मनपाच्या यंत्रणेला पाचारण करुन मला विचारल्याशिवाय पाणीपुरवठा नियोजनात बदल करू नका, असे स्पष्ट खडसावल्याचे सांगण्यात येते. केवळ २० दशलक्ष घनमीटर पाण्यावर संपूर्ण शहराचे नियोजन कसे केले? वरच्या भागातून दुर्दैवाने पाणी उपलब्ध झाले नाही किंवा कमी झाल्यास काय करणार? असाही प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. तुर्तास पुर्वीप्रमाणेच सहा दिवसआड पाणीपुरवठा ठेवावा आणि विष्णुपूरी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्यानंतर बाष्पीभवन व उपसा यामुळे होणारी तुट लक्षात घेऊन पुढील ऑगस्ट २०२० पर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन आजपासूनच तयार ठेवावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचवले. त्यानंतर मनपाने पाणीपुरवठा वेळापत्रकात २४ तासातच बदल करुन पुन्हा सहा दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे शुध्दीपत्रक काढले आहे.