नांदेड - प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा पुरवण्याच्या मागणीसाठी पेठवडज ग्रामस्थांनी आरोग्य अधिकाऱ्याच्या कार्यालयात ठिय्या केला. तब्बल दोन तास ठिय्या मांडला. त्यानंतर अखेर प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
कंधार तालुक्यातील पेठवडज प्राथमिक आरोग्य केंद्रासंबंधित समस्या सोडवण्यासाठी अनेकवेळा निवेदन देण्यात आले होते. यानंतरही अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी हा पवित्रा घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करणे तसेच औषध पुरवठा करणे, यांसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या मागण्या पूर्ण करण्यासाठी मंगळवारी (दि.19नोव्हेंबर)ला थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला. यावेळी ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य अधिकारी शिंदे यांना चांगलेच धारेवर धरले. अखेर ८ दिवसांत विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.