नांदेड : रस्त्याच्या कामासाठी गावकऱ्यांनी अनेक वेळा निवेदने दिली. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाही होता. वारंवार प्रयत्न करून रस्ता मिळत नसल्याने अखेर गंजगावसह आसपासच्या गावकऱ्यांनी 'रस्ता द्या नाही तर जीव घ्या' म्हणत बिलोली-डिचपल्ली या मुख्य महामार्गावर 'रास्ता रोको' केला. या 'रास्ता रोको' आंदोलनामुळे बिलोली-बोधन या दोन्ही महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी गावकऱ्यांनी घोषणाबाजी करीत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी गावकऱ्यांनी 'रस्ता द्या, नाहीतर जीव घ्या' अशी घोषणाबाजी परिसर दणाणला होता.
ग्रामस्थांनी शासनाचा आणि सरकारचा व्यक्त केला तीव्र निषेध : दरम्यान, रस्ता, वीज, पाणी या मूलभूत गरजांसाठी आम्हाला आंदोलन करावे लागत असेल, तसेचे ७० वर्षांत शासन आम्हाला या सुविधा देऊ शकत नसेल तर धिक्कार आहे. तेलंगणा सरकार आठ वर्षे झाले स्थापन होऊन त्यांनी आम्हाला सुजलाम् सुफलाम् केले. त्या धर्तीवर हे रस्ता, वीज, पाणी का देऊ शकत नाहीत. चार वर्षापासून आम्ही पाठपुरावा, आंदोलन करूनही काम करीत नाही. शासन, प्रशासन वेठीस धरत आहे. शेवटीची एकच मागणी आहे. 'रस्ता तरी, त्या नाहीतर जीव घ्या', अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे, असे ग्रामस्थ हणमंत पाटील कनशेट्टे यांनी सांगितले.
मूलभूत सुविधांसाठी तेलंगणात जाण्याचीसुद्धा मागणी : नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती धर्माबाद, देगलूर व बिलोली तालुक्यांतील काही गावांनी यापूर्वी मूलभूत सुविधा देण्याच्या मागणीसाठी तेलंगणा राज्यात जाण्याची मागणी केली होती. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचीही त्यांनी भेट घेतली होती. दरम्यान, जिल्हाधिकरी यांनी सीमावर्ती भागातील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या होत्या. रस्ते, पाणी, वीजेची समस्या असल्याने ग्रामस्थांना अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात सर्वाधिक वाईट परिस्थिती याठिकाणी पाहावयास मिळते. आजारी व्यक्ती, प्रसुतीसाठी महिलेला घेऊन जाताना गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते, असे सीमावर्ती भागातील ग्रामस्थांमधून सांगण्यात येते.
सीमावर्ती भागातील नागरिकांचे मूलभूत प्रश्न अजूनही प्रलंबित : नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील या धर्माबाद, देगलूर आणि बिलोली तालुक्यांतील या गावांना यापूर्वी मूलभूत सुविधासुद्धा नसल्याने सरकारने याची दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. यालाच वैतागून नागरिकांनी तेलंगणात आमचा समावेश करावा अशी मागणी केली. रस्ते, पाणी, वीजेची समस्या असल्याने ग्रामस्थांना अडचणींना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात सर्वाधिक वाईट परिस्थिती याठिकाणी पाहावयास मिळते.