नांदेड - शहरातील जुना मोंढा भागातील रणजितसिंह मार्केटमध्ये गोळीबार करून व्यापाऱ्यास लुटल्याची घटना 13 दिवसांपुर्वी घडली होती. यातील चार आरोपींना पकडण्यात आले होते. मात्र, दोन आरोपी फरार होते. या गोळीबाराच्या घटनेतील मुख्य सुत्रधार आणि लिंबगाव पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना हैदराबाद येथे पकडून स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. लखन दशरथसिंग ठाकूर (29), विक्की दशरथसिंग ठाकूर (31, दोन्ही रा. चिखलवाडी, नांदेड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नांदेड शहरातील जुनामोंढा भागातील रणजितसिंह मार्केटमध्ये व्यापाऱ्यांवर सहा जणांनी गोळीबार केल्याची 4 ऑक्टोबरला सायंकाळच्या सुमारास घडली होती. आरोपींनी एका व्यापाऱ्याकडून 10 हजार रुपये लुटून इतर दुकानांसमोर गोळीबार करून फरार झाले होते. या गोळीबारात दुकानाशेजारी असलेल्या पानपट्टीचा चालक आकाश परिहार हा जखमी झाला होता. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर गोळीबार प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेल्या चार आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र, दोन मुख्य आरोपी गेल्या 13 दिवसापासुन फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेला घटनेतील मुख्य सुत्रधार आणि लिंबगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दरोड्यातील फरार आरोपी काचीगुडा हैदराबाद येथे लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोन्ही फरार आरोपींना पकडून गजाआड केले. लखन दशरथसिंग ठाकुर (29), विक्की दशरथसिंग ठाकुर(31, दोन्ही रा. चिखलवाडी, नांदेड) अशी आरोपींची नावे आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग भारत, सहायक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल रब, पोलीस कॉन्स्टेबल मैसनवाड तानाजी येळगे, मोतीराम पवार, बडगू यांनी केली.