नांदेड - माहूर तालुक्यातील दत्तमांजरी शिवारात बैल शोधण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर काळा पाणी तलावाजवळ अस्वलाने हल्ला केल्याने दिनाक ११ मे रोजी ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर प्रथम माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर यवतमाळ येथे उपचार करून त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. २५ तारखेला त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दत्तमांजरी येथील दत्ता भगु राठोड (वय.50) हे सायंकाळी बैल घरी आले नाहीत म्हणून त्यांच्या शोधाकरता ११ तारखेला काळा पाणी तलावाकडे गेले होते. तेथे अंधारात अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना गावातील अर्जुन राठोड, अर्जुन पवार, भारत पवार, गोविंद पवार, ज्ञानेश्वर पवार, छगन राठोड यांनी तत्काळ रिक्षामधून माहूर येथील शासकिय ग्रामीण रूग्नालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात डॉ. विजयकुमार मोरे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरता यवतमाळ येथे पाठविले आहे. दत्ता राठोड याच्या कानाला, मानेवर, पाठीवर व हातावर अस्वलाने चावा घेऊन गंभीर जखमी केले असल्याने त्यांना यवतमाळ वरून नागपूर ला हलवण्यात आले होते.
१४ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, २५ तारखेला त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कवळे यांच्या कडून या संदर्भात माहिती घेतली असता शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर शासकीय निकषाप्रमाणे मृतास मदत देण्याची प्रक्रिया करू, असे त्यांनी सांगितले.