नांदेड - आयडीबीआय बँक हॅकिंग प्रकरणाचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. गुरुवारी यापैकी दोघांना नांदेड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोल्हापूर, यवतमाळ आणि दिल्ली येथून संशयितांना अटक-
आयडीबीआय बँकेचे अकाऊंट हॅक करून १४ कोटी ४६ लाख रुपयांचा गंडा घातला होता. यानंतर सायबर सेलने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणात नांदेड पोलीसांनी तिघांना अटक केली आहे.
कोल्हापूर, यवतमाळ आणि दिल्ली येथील प्रत्येकी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. संशयित आरोपींमध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.
NEFT आणि RTGS मार्फत वळवली होती रक्कम-
वजीराबाद चौकातील आयडीबीआय बँकेत शंकर नागरी सहकारी बैंकेचे खाते आहे. २ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ दरम्यान एका हॅकरने बँकेचे खाते हॅक करून त्यातून एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे तब्बल साडे चौदा कोटी रुपये इतर खात्यात वळवले. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर शंकर नागरी सहकारी बँकेने वजिराबाद आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.