नांदेड - महापालिका हद्दीतील पिरबु चव्हाणनगर येथे कोरोनाचा एक रुग्ण आढळून आल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. या रुग्णाच्या संर्पकातील आणि परिवातील सदस्यांसह इतर ५१ जणांचे स्वॅब नमुने बुधवारी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यातील ३८ जणांच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे.
नांदेड जिल्हा मागील अनेक दिवसांपासून ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, बुधवारी महापालिका क्षेत्रातील पिरबु चव्हाणनगर परिसरात एक ६४ वर्षीय रुग्ण आढळून आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नियमानुसार पिरबु चव्हाण नगर व लगतचा परिसर सहयोगनगर, अशोकनगर, भाग्यनगर, वृंदावन कॉलनी, उदयनगर, शास्त्रीनगर, टिळक नगर, विद्युत नगर, अंबेकरनगर व इंदिरानगर या क्षेत्रामध्ये रोगाचा इतरत्र प्रसार होऊ नये, म्हणून हे क्षेत्र कन्टोनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीच्या परिवारातील सदस्यांसह इतर व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यातील ३८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर त्या परिवारातील ८ जणांना एनआरआय निवास येथे ठेवण्यात आले आहे.
आत्तापर्यंत नांदेड येथून ५५६ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ४९१ निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, दुसऱ्या दिवशी मनपाच्या आरोग्य पथकाकडून या कन्टोनमेंट झोनमध्ये १३ हजार ३०९ जणांची थर्मल मशिनव्दारे तपासणी करण्यात आली आहे.