नांदेड - एका तृतीयपंथीयाशी ओळख वाढवून त्याच्याशी अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही तर आरोपीने ७ लाख रुपयांची फसवणूकही केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नांदेड पोलिसांनी एका तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील दत्तनगर परिसरात राहणाच्या एका तृतीयपंथीय व्यक्तीची शहरातील नई आबादी भागातील रहिवासी फैसल मोईज सिद्दीकी याच्यासोबत मैत्री झाली होती. गेल्या वर्षभरापासून मैत्रीतून त्यांनी एकमेकांचा विश्वास संपादन केला होता. तुला जीवनभर सांभाळतो, असे म्हणत फैसलने तिच्याकडून कार खरेदीसाठी ७ लाख रुपये घेतले आणि वेळोवेळी तिच्या इच्छेविरुध्द अनैसर्गिक अत्याचारही त्याने केला. एवढेच नव्हे तर त्याने जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी फैसलविरुध्द कलम ३७७, ४०६, ४२०,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फसके, पोलीस निरीक्षक सी. टी. चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक होळकर करीत आहेत.