नांदेड - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता टाळेबंदी करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांनी यंदा होला-महल्ला मिरवणुकीची परवानगी नाकारली होती. मात्र, ठराविक लोकांच्या उपस्थित शस्त्र पूजा करण्याला परवानगी होती. मिरवणूक काढू नये म्हणून जिल्हाधिकारी विपीन इटनकर आणि गुरुद्वाराची प्रशासकीय समिती व संत बाबा कुलवंतसिंगजी, संत बाबा बलविंदरसिंगजी यांच्याशी चर्चा केली होती. सर्वांनी त्यावेळी मिरवणूक काढणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच समाजाला आवाहनही केले होते. धुळवडीच्या दिवशी सायंकाळी चार वाजता अरदास झाल्यानंतर गुरुद्वाराच्या आत होला-महल्ला मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काही अति उत्साही तरुणांनी मिरवणूक गुरुद्वाराच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी धर्मगुरुंनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण, काही तरुण ऐकण्याच्या तयारीत नव्हते, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. काही तरुणांमुळे या मिरवणुकीला गालबोट लागले पोलीसांनाही याचे परिणाम भोगावे लागले. देशभर नांदेडच्या या प्रकरणाची चर्चा झाली.
होला-महल्ला ला गेल्या साडेतीनशे वर्षाची परंपरा....!
गेल्या साडेतीनशे वर्षापासून धुलीवंदनाच्या दिवशी शस्त्रांची पूजा करून होला-महल्ला मिरवणूक असते. संबंध देशभरातील शीख भाविक या कार्यक्रमाला येतात. शीख धर्मीयांच्या दीपावली, दसरा, बैसाखी आणि होला-महल्ला हे महत्वाचे सण असतात. होला-महल्ला या मिरवणुकीची मुख्य प्रेरणा शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंगजी असून पंचक्रोशीतील अनेक भाविकांची उपस्थिती असते. दरवर्षी पारंपारिक मार्गाने ही मिरवणूक निघत असते. देशभरातून शीख भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
गुरुद्वारामध्येच होला-महल्ला सण साजरा करण्याचे ठरले होते
दरवर्षी उघडी शस्त्रे घेऊन होला-महल्ला मिरवणूक काढण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता 25 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात टाळेबंदी लागू आहे. यामुळे कुठलीही मिरवणूक काढू नये, अशी विनंती प्रशासनाने गुरुद्वारा बोर्ड व बाबाजी यांच्याकडे केली होती. त्यानंतर गुरुद्वारामध्येच हल्ला-महल्ला हा सण साजरा करावा, असेही आवाहन केले होते. याला सर्वांनी सहमतीही दर्शविली होती.
अति उत्साही तरुणांचा अट्टहास आला अंगलट
पण, काही अति उत्साही तरुण कुणाचेही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यांनी पारंपरिक मार्गानेच मिरवणूक काढण्याचा आग्रह धरत बॅरिकेट्स तोडून हातात उघडी शस्त्रे घेऊन पोलिसावरच हल्ला केला. चारशे ते पाचशेच्या तरुणांच्या समूहाने अचानकपणे हल्ला केल्यामुळे पोलिसांनाही काय करावे सुचेनासे झाले. अनेक पोलिसांवर तलवार व भाल्यानेही हल्ला करण्यात आला. पोलीस अधीक्षक शेवाळे यांनाही भाला फेकून मारण्यात आला. त्याचवेळी त्यांचे अंगरक्षक तो वार स्वतःवर घेऊन त्यांचे प्राण वाचविले. मात्र, त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली असून तब्बल पन्नास टाके घालण्यात आले आहे. तसेच अनेक पोलीस रक्तबंबाळ झाले. पोलिसांच्या व त्याठिकाणी असलेल्या सर्वच वाहनांची तोडफोड त्या तरुणांनी केली. तसेच अनेक चित्रिकरण करणाऱ्या नागरिकांचे मोबाईलही फोडून टाकले. एकंदर परिस्थिती पाहीली प्रचंड रोष या तरुणांनी व्यक्त करून एका चांगल्या प्रथेला गालबोट लावण्याचे काम केले. काही अति उत्साही तरुणांचा अट्टहास अंगलट आला आहे.
काही तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते - पोलीस अधीक्षक
यंदा टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मिरवणुकीसाठी परवानगी नाकारली होती. सोमवारी (दि.29 मार्च) सायंकाळी चार वाजता गुरुद्वारात अरदास (आरती) झाल्यानंतर काही तरुण भाविकांचे जत्थे हातात उघड्या तलवारी घेवून मिरवणूक गुरुद्वाराच्या बाहेर घेवून आले. यावेळी पोलिसांनी अटकाव करताच त्यांच्यावर भाला आणि तलवारीने हल्ला करण्यात आला. यामध्ये आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांच्या आठ वाहनांचे नुकसान झाले. यावेळी काही अति उत्साही तरुणांनी मिरवणूक गुरुद्वाराच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी धर्मगुरुंनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नांदेड शहरातील शीख भाविकांच्या होला-महल्ला मिरवणुकी दरम्यान पोलिसांवर हल्ला करणाऱ्या त्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली असून चारशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे साठ जणांची नावे ओळखण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा चारशे जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अठरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गुरुद्वाराच्या वतीने राबविण्यात येतात अनेक सामाजिक उपक्रम
गत वर्षापासून कोरोनाच्या संकट काळात लाखो भुकेल्या लोकांच्या पोटात अन्नाचा घास देण्याचे महत्वपूर्ण काम गुरुद्वारा येथील लंगरसाहिबच्या माध्यमातून होत आहे. ज्यावेळी कुणीही येण्यासाठी धजावत नव्हते अशावेळी गुरुद्वाराकडून रस्त्यावर फिरून जेवण वाटप करण्यात येत होते. तसेच मादीस वर्षापासून पंजाब भवनमध्ये कोविड सेंटर सुरू असून शहरातील एक चांगली सेवा त्या ठिकाणी मिळत आहे. यासह अनेक सामाजिक काम सचखंड गुरुद्वाराच्या माध्यमातून सुरू असतात.
हेही वाचा - पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 'त्या' आरोपींची कुठल्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही - प्रमोद कुमार शेवाळे