नांदेड - शहरात मुलींची छेड काढण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या रोडरोमिओंच्या त्रासाला कटांळून विद्यार्थीनींनी त्यांना चोप दिल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत डॉ. हेडगेवार चौकात एका विद्यार्थिनीने छेड काढणाऱ्या रोडरोमिओला बदडले तर दुसऱ्या घटनेत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात छेड काढणाऱ्या रोडरोमिओला विद्यार्थिनीसह तिच्या आईने बदडले.
गुरुवारी नायगाव शहरात 'स्मार्ट गर्ल' हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी मुलींना स्वरक्षणासंबधी मार्गदर्शन केले. रस्त्यावर कुणी छेड काढल्यास, त्रास दिल्यास त्यांना चोप देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देणारी घटना शुक्रवारी घडली. पहिली घटना डॉ. हेडगेवार चौकात घडली. या परिसरात एका विद्यार्थिनीने छेड काढणाऱ्या रोडरोमिओला बदडले. तर दुसऱ्या एका घटनेत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात एका विद्यार्थिनीने आणि तिच्या आईने तिची छेड काढणाऱ्या रोडरोमिओ तरुणाला बदडले.
हेही वाचा - व्यसनमुक्ती केंद्रातून मुक्तता मिळावी म्हणून ‘त्या’ दोघींनी केला सहकारी तरुणीचा खून!
नायगाव शहरात विविध शैक्षणिक संस्था, कृषी, तंत्रनिकेतन, फूड टेक्नालॉजी अशी अनेक विद्यालये आहेत. या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी परराज्यातून अनेक विद्यार्थी येथे येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात रोडरोमिओंचा प्रचंड हैदोस वाढला आहे. त्यांच्याद्वारे मुलींची छेड काढण्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. शहरात सकाळच्या वेळी विविध क्लासेस, महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांनीची लगबग सुरू असते. या दरम्यान, रोडरोमिओ या परिसरात रस्त्यावर दुचाकी भरधाव वेगाने चालवतात, सतत हेलपाटे मारत मुलींची छेड काढत असतात. मात्र, या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याऐवजी पोलीस बघ्यांची भूमिका घेत असल्याने या रोडरोमिओंचे मनोधैर्य वाढले आहे.