नांदेड- चोरी, प्राणघातक हल्ला या सारखे गंभीर गुन्ह्ये करून पोलिसांची झोप उडविणाऱ्या शेरासिंग दलबीरसिंग खैर उर्फ शेरू याला ४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी चकमकीत ठार मारले होते. आता या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खंडणी, जबरी चोरी या सारख्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. रिंदा या गुन्हेगाराची दहशत तर व्यापाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी रिंदा गँगची पाळेमुळे उद्धवस्त करण्याचे आदेश दिले. चार टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करताना नांदेड पोलिसांनी अनेकांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांची विशेष मोहीम सुरु असताना ३ नोव्हेंबर रोजी श्रीनगर परिसरात शेरासिंग व त्याच्या साथीदाराने एका व्यापाऱ्याच्या छातीवर बंदूक रोखत ऐवज लुटला होता. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली व त्याच दिवशी अजय ढगे याला ताब्यात घेतले. या प्रकरणातला आरोपी शेरासिंग यावेळी पोलिसांच्या तावडीतून निसटला होता. ४ नोव्हेंबर रोजी अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारसगाव शिवारातील एका आखाड्यावर तो असल्याचे समजल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग भारती यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला शरण येण्याचे आवाहन केले. परंतु, त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तर दाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जागीच मरण पावला.केवळ नांदेडच नव्हे तर पंजाब राज्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांची नोंद त्याच्यावर होती.
या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चकमकीनंतर पोलिसांच्या वतीने मानवाधिकार आयोगाला योग्य तो अहवाल पाठविला. गृह विभागाच्या नव्या सुचनेनुसार आता या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे. सोमवारी सीआयडीचे अधिकारी या प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेणार आहेत. सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील तपासणीसाठी नांदेडात दाखल झाले. आज ते घटनास्थळाची पाहणी करून सीआयडीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना करण्याची शक्यता आहे.