नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे कोरोना योद्ध्यांचा म्हणजेच प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, पारिचारिका, ब्रदर्स यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन ‘निर्जंतुकीकरण वाहने’ नांदेड शहरामध्ये सेवेत दाखल झाली आहेत. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी आज वाहनाचे उद्घाटन करून सेवेसाठी नांदेड शहरामध्ये पाठविली.
शहरामध्ये अनेक कोरोना योद्धे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. त्यांच्यासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे, या सकारात्मक भावनेतून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या कल्पनेतून निर्जंतुकीकरण करणारी वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. सदर वाहने शहरातून प्रत्येक ठिकाणी जाणार आहेत. त्याठिकाणी कर्तव्यावर उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांना या वाहनामध्ये दहा सेकंद उभे केले जाईल. सॅनिटायझर द्रव्याचा फवारा त्यांच्या सर्वांगावर पडणार आहे. जेणेकरून त्यांच्या कपड्यासहित सर्वांगाचे निर्जंतुकीकरण होणार आहे.
कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या प्रतिकारासाठी केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा प्रशासन या सोबतच निमशासकीय आणि सामाजिक संस्थाही प्रयत्न करीत आहेत. कोव्हिड-१९ विरोधी लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वाहने देण्यात आली आहेत.