नांदेड - लॉकडाउन काळात सलग चार ते पाच महीने वीज बिले वाटप करण्यात आली नाहीत. त्यानंतर आलेली वीज बिले एकत्रित दिल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना एकदम एवढा मोठा आर्थिक बोजा सहन करणे शक्य नव्हते. लॉकडाउन काळातील वीज बिलात सूट देण्यात येईल अशी भूमिका सुरूवातीला सरकारने घेतली होती. मात्र, नंतर ती भूमिका सोईस्कर पने बदलली. लॉकडाऊन काळात आर्थिक मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ऐन मार्च महिन्यात संपूर्ण वर्षाचे थकीत वीज बिल भरणे सर्व सामान्य घरगुती ग्राहकांना शक्य होत नाही. लॉकडाऊन काळातील घरगुती वीजग्राहकावर लादण्यात आलेली विजबिल माफ करण्यात यावी व घरगुती व शेतीतील विज ग्राहकांची वीज तोडणी थांबविण्यात यावी अशी प्रमुख मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना वीज कमी आणि बिल जास्त -
यावर्षी चांगला पावसामुळे सर्व बंधारे धरणे भरली आहेत. विहीरीना सुद्धा मुबलक प्रमाणात पानी उपलब्ध असल्यामुळे बागायती पिकांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मार्च महिन्यात बागायती पिकांना पाण्याची गरज असताना महावितरणचे कर्मचारी शेतीची वीज कनेक्शन तोडत आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या 2020 च्या अहवालनुसार शेती पंपाला प्रती वर्ष 300 दिवस, प्रती दिन 10 तास म्हणजेच प्रती वर्ष 3000 तास वीज उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. शेतकर्यांना कशीबशी प्रती दिन 7 ते 8 तास ते पण वर्षातील 150 ते 200 दिवसच वीज उपलब्ध होत असतांना शेतकर्यांना मात्र संपूर्ण काळाची म्हणजे 3000 तासांची वीज बिले आकरण्यात आली आहेत. शेतकर्यांना कुठलीच बिले न देताच परस्पर बिल न भरल्याबद्दल शेतीची वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत.
स्वाभिमानाचा आंदोलनाचा इशारा -
शेतीची वीज कनेक्शन तोडणी तत्काळ न थांबवल्यास महावितरण विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने आक्रमक आंदोलन पुकारण्यात येइल असे निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी उच्च धिकार समिती अध्यक्ष डॉ.प्रकाश पोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील राजेगोरे, ज्येष्ठ नेते किशनराव कदम, वळसे पाटील, तालुकाध्यक्ष मारोतराव भांगे उपस्थीत होते. जिल्ह्यात यावेळी युवा आघाडी अध्यक्ष शिवशंकर कलंबरकर, पक्षाचे अध्यक्ष धनराज कोळेकर, उपाध्यक्ष शिवाजी राव वानखेडे, हदगाव तालुकाध्यक्ष ईश्वर गट्टणी, भोकर तालुकाध्यक्ष गोविंद पोमनालकर यांच्या नेतृत्वात मुकरामबाद, देगलूर, हदगाव, भोकर या ठिकाणी निवेदन देण्यात आले.